Friday, September 11, 2015

गोविंद पानसरे यांची हत्या आणि काही प्रश्न

ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख...
हत्या झाली की पहिला प्रश्न निर्माण होतो, हत्या करण्याचा हेतू कोणता असावा? आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो, हत्येमुळे सर्वाधिक लाभ कोणाला होणार होता?


कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे दिनांक 16 फेब्रुवारी 15 रोजी मारेकऱ्यांनी गोळया झाडल्या आणि त्यांची प्राणज्योत 20 फेब्रुवारीला मालवली. पानसरे 82 वर्षांचे होते. ही हत्या झाल्यानंतर मला माझ्या जवळच्या मित्राने फोन केला आणि तो म्हणाला, 'रमेश, पानसरेंची हत्या झाली, हे तुला कळले असेचल. आता या हत्येचा उपयोग करून सर्व हिंदुत्ववाद्यांना झोडपण्यात येईल.'
त्याचे म्हणणे खरे होते आणि मलाही तसेच वाटले. हत्या झाल्यानंतर काही तासाच्या आतच महाराष्ट्रातील सगळी हिंदुत्वविरोधी ब्रिगेड सक्रिय झाली आणि पत्रके, भाषणे, परिसंवाद, दूरदर्शन वाहिन्यांवरील चर्चा यावर प्रचाराचा एक धुमाकुळ सुरू झाला. मालिका किंवा चित्रपटामध्ये स्क्रिप्ट रायटर असतो आणि अभिनय करणारे सगळे जे लिहिलेले असते ते बोलत जातात. हिंदुत्ववाद्यांच्याविरोधात प्रचाराची एक स्क्रिप्ट लिहिली गेली आहे. आणि तिचे अनुसरण स्वत:ला बुध्दीवादी, पुरोगामी, मानवतावादी, रॅशनल म्हणणारे सगळेजण करीत असतात.आणि हे नाटय महाराष्ट्रात आणि देशातही 1948 सालापासून सुरू आहे. माझी पिढी त्यातच वाढली त्यामुळे याबद्दल सध्या काही वाटेनासे झाले आहे.

भाई गोविंद पानसरे यांची ते 82 वर्षांचे झाले असताना हत्या होणे ही अत्यंत वाईट गोष्ट झाली. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी कम्युनिस्ट भक्त नाही. कम्युनिस्टांबद्दल मला सदैव भीती वाटत आलेली आहे. रशियात लेनिन आणि स्टालिन यांनी काय केले, चीनमध्ये माओने काय केले आणि या दोन्ही ठिकाणी किती कोटी माणसे मारली, याची भरपूर पुस्तके वाचली आहेत. अलेक्झांडर सोल्झेनित्सिन याचे गुलाग आर्चीपिलॅगो हे पुस्तक जेव्हा मी वाचले तेव्हा कम्युनिस्ट राजवट ही आपल्या पुराणातील राक्षसी राजवटींना बाळबोध राजवट ठरविणारी वाटते. अंगावर काटा उभा राहिला आणि तो काळ आणीबाणीचा असल्यामुळे शब्दश: माझी झोप उडाली. कम्युनिस्टांनी मानवी जीवनातील माधुर्य, स्नेहभाव, विश्वास का नष्ट केला, हे वाचणे देखील अशक्य असते. अशा कम्युनिस्टांबद्दल मनात प्रेम निर्माण होणे कठीणच आहे.

तरीसुध्दा भाई गोविंद पानसरे यांची हत्या झाल्याबद्दल दु:ख झाले. रशिया, चीनमधील कम्युनिस्ट मानवी रक्ताला चटावले असले तरी भारतातील हिंदू कम्युनिस्ट हिंदू संस्कारांमुळे त्या मानाने फार मवाळ असतात. ते अत्यंत साधे जीवन जगतात. श्रमिक आणि गरिबांशी एकररूप होतात. नंबुद्रीपाद यांचे बनियन मधले फोटो पाहिले की, त्या माणसाबद्दल आदर वाटल्याशिवाय राहात नाही. गोविंद पानसरे देखील त्याच पिढीतील होते. राहाणी साधी आणि आपल्या विचारधारेप्रमाणे जगणे, सामान्य लोकांत राहाणे अशा प्रकारची गुणवत्ता आज अस्ताला जात आहे. गोविंद पानसरे त्या पिढीतील कदाचित अखेरचे दुवे असावेत.

हत्या झाली की पहिला प्रश्न निर्माण होतो, हत्या करण्याचा हेतू कोणता असावा? आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो, हत्येमुळे सर्वाधिक लाभ कोणाला होणार होता? वैचारिक कारणासाठी हत्या करणे ही भारताची परंपरा नाही. वैचारिक हत्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची झालेली आहे. आणि या हत्येचा कट अत्यंत विचारपूर्वक आणि कोणताही धागा-दोरा मागे न ठेवणारा, असा होता. अशी हत्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तहेर संघटनाच करू शकतात. सीआयए अमेरिकेची संघटना आहे. दीनदयाळांची हत्या करून अमेरिकेला कोणताही लाभ होणारा नव्हता. मोसाद ही इस्त्राएलची गुप्तहेर संघटना आहे तिलाही दीनदयाळांच्या हत्येतून कसलाही लाभ नव्हता. केजीबी ही रशियाची संघटना होती. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी कम्युनिझमला आव्हान देणारे तत्त्वज्ञान उभे केले होते. असे जबरदस्त वैचारिक आव्हान कोणीही तयार केले नव्हते. त्यामुळे कम्युनिझमच्या फायद्यासाठी दीनदयाळ यांना नाहिसे करण्यात आले.

कॉम्रेड गोविंद पानसरे हे भारतातील कोणी महान विचारवंत होते, किंवा त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्यायांसारखे एक वैचारिक आव्हान उभे केले, असे काही नव्हते. त्यांचे नाव देखील महाराष्ट्रातील युवा पिढीला माहीत नाही. ते गेल्यानंतरच अनेकांना वर्तमानपत्रातून आणि प्रसिध्दीमाध्यमातून त्यांचे नाव समजले. महाराष्ट्रातही त्यांच्या रूपाने मोठे सामाजिक किंवा राजकीय आव्हान उभे ठाकले होते असेही नाही. यामुळे या कारणासाठी त्यांची हत्या करण्यात आली असावी, असे म्हणणे अत्यंत बालिशपणाचे आहे. ते टोलनाक्यांविरुध्द संघर्ष करीत होते आणि टोलमुळे एक राजकीय भ्रष्ट लॉबी कशी उभी राहिली आहे याबद्दल ते लिहीत, बोलत होते. त्यांच्या विषयी अभय नेवगी यांनी एक श्रध्दांजली लेख लिहिला आहे. त्यात ते लिहितात, 'महाराष्ट्रातील टोलचा विषय जेव्हा त्यांनी हाती घेतला तेव्हा त्यांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांच्यामते टोल नुसतेच अन्यायकारक नसून ते न संपणाऱ्या भ्रष्टाचाराची जननी असून सामान्य माणसांची किंमत देऊन राजकारण्यांना समृध्द करणारे आहेत. हा प्रश्न न्यायालयात आणि राजकीय वर्तुळात अडकलेला आहे. म्हणून अनेकांना असे वाटते की, हा प्रश्न त्यांनी हातात घेतल्यामुळे गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली असावी.' हत्येचा लाभ होणारी टोललॉबी असेल तर ती संशयाच्या वर्तुळात यायला काही हरकत नाही. त्या दिशेने पोलिसांचा तपासही सुरू झाला असणार.

दुसरा प्रश्न निर्माण होतो की, हत्येचा लाभ आणखी कोणा कोणाला होणार होता? केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील आणि देशातील तथाकथित पुरोगामी, सेक्युलर, लिबरल मंडळी फारच अस्वस्थ झालेली आहेत. येनकेन प्रकारेण सरकारला बदनाम करण्याचा विडाच या लोकांनी उचलला आहे. प्रसिध्दी माध्यमात ही सर्व मंडळी बसलेली आहेत. यामुळे सरकारवर टीकेची झोड उठविण्याची कोणतीही संधी ते घालवित नाहीत. संधी नसेल तर संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हा गेल्या आठ महिन्यांचा इतिहास आहे. या सरकारला बदनाम करण्यात लाभार्थी असणारा राजकीय वर्ग देशात नाही, असे कोणी म्हणू शकत नाही. या वर्गाला लाभ करून देण्यासाठी कोणीतरी दूरवर बसून, योजना आखून कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा गेम केला असावा. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याबरोबर निषेध आणि विरुध्द प्रचाराचे जे रान उठविण्यात आले त्याची अर्थसंगती लावता येत नाही. रिपब्लिकन पार्टी ही स्वत:ला आंबेडकरी विचारधारा मानणारी पार्टी समजते. आणि आंबेडकरांचे कम्युनिझमसंबंधीचे मत 'कम्युनिझम हा जंगल वणवा आहे आणि त्यापासून सावध राहिले पाहिजे,' असे होते. चळवळीतील बहुतेकांना आंबेकर पाठ असतो, तरीसुध्दा रिपब्लिकन पार्टीवाले इतके कम्युनिस्ट भक्त कसे झाले? असा प्रश्न निर्माण होतो.

भाई गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचा सध्या भरपूर उल्लेख चालू आहे. समजा, 'शिवाजी कोण होता?' हेच शीर्षक ठेऊन मी रमेश पतंगे याने पुस्तक लिहिली असते, तर काय झाले असते? महाराष्ट्रातील सगळी पुरोगामी मंडळी माझ्या मागे हात धुवून लागली असती. संभाजी ब्रिगेडने माझ्या घरावर हल्ला केला असता. माझी खांडोळी करण्याची धमकी दिली असती कारण पुस्काच्या शीर्षकात शिवाजीचा उल्लेख एकेरी आहे. हा शिवाजी महाराजांचा फार मोठा अपमान आहे, असा प्रचार झाला असता. एका गरीब लेखकाने तरुणाच्या तोंडी असणाऱ्या फुले यांच्या वाक्प्रचाराचा उल्लेख आपल्या लेखात केला आणि लोकसत्तेला माफी मागावी लागली. पानसरे भाग्यवान खरे. कारण पुरोगामी ब्रिगेडने पुस्तकाच्या शीर्षकाकडे लक्ष दिले नाही.

पुस्तकही शिवाजी महाराजांच्या जीवनपैलूंवर नवीन प्रकाश टाकणारे आहे, असेही नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यात आणि राज्यकारभारात महत्त्वाच्या जागी मुसलमान होते. हे सर्वांना माहीत आहे, त्यात नवीन काही नाही. शिवाजी महाराजांनी मुसलमानांचा मुसलमान म्हणून छळ केला नाही. यातही नवीन काही नाही, ते सर्वांना माहीत आहे. कल्याणच्या सुभेदाराची सुन त्यांनी सन्मानपूर्वक परत पाठविली, ही कथाही सर्वांना माहीत आहे. शिवाजी महाराज असे वागत होते कारण ते आदर्श हिंदू होते. पानसरेंना तेवढेच पसंद नव्हते. त्यांनी शिवाजी महाराजांना सेक्युलर करून टाकले. जणूकाही हिंदू असणे म्हणजे सेक्युलर नसणे. हे ऐतिहासिक सत्य नाही. भारतात धर्मछळामुळे सिरियन ख्रिश्चन आले. राजे हिंदू होते त्यांनी त्यांचे स्वागत केले. धर्मछळामुळे ज्यु आले. राजे हिंदू होते त्यांनी त्यांचे स्वागत केले. गुजरातच्या किनाऱ्यावर पारशी आले. राजे हिंदू होते, त्यांनी त्यांचे स्वागत केले. मुस्लीम आक्रमणे सुरू होण्यापूर्वी सुफी संत आले, राजे हिंदू होते त्यांनी त्यांचे स्वागत केले. कम्युनिस्ट आणि पुरोगाम्यांना हा इतिहास सोयीचा नसतो. म्हणून इतिहासाशी खिलवाड करून ते आपल्या विचारसरणीप्रमाणे इतिहास मांडतात. शिवाजीच्या सैन्यात जसे मुसलमान होते, सरकारी खात्यात जसे मुसलमान होते तसे आदिलशाहच्या राज्यात आणि औरंगजेबाच्या राज्यात हिंदू सरदार आणि अधिकारी होते. त्यामुळे आदिलशाह सेक्युलर होता का? औरंगजेब सेक्युलर होता का? युक्तिवाद एकतर्फी करता येत नाही. तो फसवा असतो. आपण त्यात फसू नये.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा उपयोग नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कसा करता येईल? हे समजून घ्यायचे असेल तर वाचकांनी रना आयुब यांचा लेख वाचला पाहिजे. शोध पत्रकारिता करणाऱ्या महिला असा त्यांचा परिचय दिला जातो. कॉम्रेड पानसरे यांची हत्या आणि नेरंद्र मोदी यांचा बादरायण संबंध देखील नाही. पण तो संबंध आहे, हे जर आपण दाखविले नाही तर आपण शोध पत्रकारिता केली, असे होणार नाही. लेखाचे शीर्षकच आहे, 'मिस्टर पिएम, वुई कुड हॅव सेव्हड् गोविंद पानसरे' या शोध पत्रकारिता करणाऱ्या रना आयुब यांनी गोविंद पानसरे नथुराम गोडसेंबद्दल काय म्हणाले. ओबामा धार्मिक सहिष्णुतेबद्दल काय म्हणाले. गोविंद पानसरे यांचा निषेध सभेत कोणी कसा केला. हिंदू युवकांवर त्यांनी कशी टीका केली. त्यांच्या शिवाजी या पुस्तकावर विश्व हिंदू परिषद आणि संघाने कसे रान उठविले वगैरे वगैरे संदर्भ लिहिले आहेत. आणि पिएम ना या सर्व गोष्टी माहीत नसतील का? त्या थांबविण्याचा त्यांनी प्रयत्न का केला नाही? वगैरे वगैरे...

प्रश्न असा निर्माण होतो की, भाई पानसरे यांच्या मृत्यूचे या मंडळींना खरोखर दु:ख झाले आहे की, मोदी, भाजपा आणि फडणवीस यांना झोडण्यासाठी एक साधन मिळाले, याचा आनंद झाला आहे? पानसरेंच्या मृत्यूचा छडा आज ना उद्या लागेलच आणि गुन्हेगार सापडतीलच. प्रत्येक गुन्ह्यच्या ठिकाणी गुन्हेगार काही ना काही पुरावा ठेऊन जातो. त्या पुराव्याच्या आधारे गुन्हेगारापर्यंत कधी तात्काळ पोहोचता येते तर कधी वेळ लागतो. पानसरे यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली आहे आणि ज्यांनी ती घडवून आणली आहे. ते या गुन्हे शास्त्रातील अत्यंत तज्ज्ञ असावेत. त्यांच्यावर मात करण्यासाठी तपास यंत्रणेला पुरेसा वेळ आणि संधी द्यायला पाहिजे. शेवटचा प्रश्न असा आहे की, जेव्हा खरे गुन्हेगार सापडले जातील आणि सत्य बाहेर येईल, तेव्हा आज सत्यासाठी तमाशा करणारी मंडळी काय करतील?

- रमेश पतंगे
***
अवश्य वाचा
हिंदू - बौद्ध ऐक्यातून सजग सुसंवादाचे नवे पाऊल

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी