Friday, February 22, 2013

सूर्यनमस्कार : संपूर्ण व्यायाम


स्वामीजी स्वत: दररोज सूर्यनमस्कार करीत, असा उल्लेख त्यांच्या चरित्रात आढळतो. ऋषिप्रणीत गोष्टी नेहमी उपकारकच असतात, हे आपल्याला स्वामीजींच्या सूर्यनमस्कारोपासनेतून कळून येईल.
 वैज्ञानिक आधारावर आविष्कृत झालेल्या आणि स्वामी विवेकानंदांसारख्या अद्भुत महापुरुषाने पुरस्कृत केलेल्या सूर्यनमस्कारांना संपूर्ण व्यायाम असे संबोधल्यास वावगे ठरणार नाही. 

साभार / तरुण भारत 

तारीख: 2/18/2013 12:48:59 PM
  आहार आणि विहार हे स्वास्थ्य टिकविणारे आयुष्याचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. आहार हे आयुर्वेदशास्त्रानुसार ‘महाभैषज्य’ आहे.अर्थात आहारामध्येच स्वयंभू औषधीय गुणधर्म आहेत. त्याबरोबरच विहार म्हणजे जीवनशैली ही देखील स्वास्थ्यरक्षणाची ‘मास्टर की’ म्हणावी लागेल. त्यातही प्रामुख्याने शरीराच्या हालचालींचा समावेश होतो. ज्या कोणत्या क्रियेद्वारे आपण शरीराला आयास उत्पन्न करतो, (अगदीच वर्‍हाडी थाटात म्हणायचे झाले, तर ज्या क्रियांनी शरीराला नेट लागतो)अशा क्रियेला व्यायाम म्हटले आहे.
 शरीरचेष्टा या चेष्टा स्थैर्यार्था बलवर्धिनी
 | देहव्यायामसंख्याता मात्रया तां समाचरेत॥
 असे सूत्र आयुर्वेदात सांगितले आहे. स्थिरत्व टिकविणे आणि बळ वाढविणे या दोन्ही गोष्टी व्यायामातून साध्य होणे अभिप्रेत आहे. पंचमहाभूतांपासून बनलेल्या शरीराचे संतुलन पांचभौतिक उपक्रमाद्वारे करणे सहज-सुलभ आहे. त्यामुळे सृष्टीतील अग्नितत्त्व असलेल्या सूर्याचे नमस्कार हा देखील पांचभौतिक व्यायाम ठरतो.
 वास्तविक पाहता, सूर्यनमस्कार हा बारा शारीरिक स्थितींद्वारे दहा विविध योगासनांचा अभ्यास आहे. त्यात केवळ सूर्य सापेक्ष असे काही दिसत नाही. पण तरीही त्याला सूर्याप्रति समर्पित का मानले असावे? पृथ्वीप्रमाणे किंवा जलप्रणिपात नावानेही तेच व्यायाम करता येणे सहज शक्य होते, पण त्याच्या केन्द्रस्थानी सूर्यालाच ठेवले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत्’ असे सूत्र प्रसिद्ध आहे. आरोग्याचे दान सूर्याकडून मिळणार, हे खरे पण ते काही धार्मिक आधारावर सांगितलेले नाही. अगदी ‘सूर्यो न: दिवस्वातु’ म्हणणार्‍या ऋग्वेदापासून ‘रसायनं सौर्यमारुतिकं विद्यात्’ म्हणणार्‍या आयुर्वेदापर्यंत सूर्याची वर्णने जैव-पर्यावरण आधारावरच केलेली आहेत. सूर्य हा जैव-ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. ज्या आधारावर प्राणिमात्रांचे पोषण होते, त्या अन्न-धान्य पिकांची आणि औषधी वनस्पतीची रुजवात आणि वाढ सूर्यप्रकाशाशिवाय होणे केवळ अकल्पनीय आहे. सूर्यप्रकाशाशिवाय पाण्यातील घातक जीवाणूंची वाढ थांबविणे शक्य नाही. त्यामुळे जीवसृष्टीच्या आरोग्याच्या केंद्रस्थानी सूर्याला मानले आहे. न्यूटनच्या तिसर्‍या सिद्धांतानुसार ऊर्जेचे स्वरूप बदलत असते. त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास सौर-ऊर्जा हीच विविध ऊर्जांमध्ये परिवर्तित होऊन जीवसृष्टीला ऊर्जस्वल करीत असते. ही सूर्याची ऊर्जा प्राप्त करायची असेल, तर मनुष्याला सूर्यप्रकाशात उभे राहणे गरजेचे आहे. तो सूर्यप्रकाश देखील सुसह्य प्रमाणात असावा, त्यामुळे सकाळच्या प्रहरी सूर्यनमस्कार करण्याचा परिपाठ आहे.
 सूर्यप्रकाशाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अस्थींना मिळणारी बळकटी, अस्थींच्या पोषणाकरिता आवश्यक असणारा घटक म्हणजे कॅल्शियम आणि पर्यायानेच जीवनसत्त्व ड. कोवळ्या सूर्य-किरणांपासून जीवनसत्त्व ड मिळते. मनुष्याच्या त्वचेवर ही किरणे पडताच मानवीय/प्राण्यांच्या शरीरातील अस्थींची कॅल्शियम शोषण्याची शक्ती वाढते. सूर्यनमस्कार करताना त्वचेवर सूर्यकिरणे पडतात आणि ही पोषणप्रक्रिया सहज घडून येते. पण त्वचेवर सूर्यप्रकाश पडण्यासाठी दहा-बारा आसनांचे कष्ट कशाला? केवळ उन्हात उभे राहिले असते ती चालायला हवे होते. पण त्यामागे संकल्पना अशी की, एकाच स्थितीत उभे राहिल्यास संपूर्ण शरीरातील सर्व अस्थींना त्याचा लाभ होणार नाही. जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो, तेव्हा दहा आसनांद्वारे बारा विविध शरीरस्थिती साधतो. त्यामुळे शरीराच्या जवळ-जवळ प्रत्येक अवयवावर पाठ-पोट, तल-मल-सार्‍या कोनातून सूर्यप्रकाश पडतो आणि सार्वदेहिक अस्थिपोषणाची प्रक्रिया साधते.
 लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदस: क्षय:
|विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते॥
 असे व्यायामाचे लाभ आयुर्वेदात वर्णित आहेत. सूर्यनमस्कारांमुळे हलकाई येते. हा लाभ तर अनुभवसिद्ध आहे. दहा-बारा सूर्यनमस्कारांत मनुष्याची बर्‍यापैकी कसरत होते. हा आयासच कर्मसामर्थ्य (स्टॅमिना) वाढविण्यास उपयुक्त ठरतो. मेदाचा क्षय (चरबी वितळणे) आणि सुगठित पीळदार शरीर हा लाभही सूर्यनमस्कारांनी होतो. मानवशरीरातील अग्नितत्त्वाचे प्रतीक म्हणजे जठराग्नी होय. ‘अग्निमूलं बलं पुंसाम्’ असे आयुर्वेदात म्हटले आहे. अर्थात जठराग्नीच्या शक्तीवर म्हणजेच पाचनशक्तीच्या बळावर शरीरस्वास्थ्य अवलंबून असते. अशा वेळी सृष्टीतील अग्नितत्त्व (सूर्य) हे मानवशरीरातील अग्नितत्त्वाला (जठराग्नीला) संतुलित ठेवत असते. त्यामुळे सूर्यनमस्कार हे पाचनशक्तीला योग्य राखण्यात मदत करतात.
 योग्य मात्रेत घेतल्यास विषसुद्धा औषधीयुक्त गुण दाखविते. याउलट, अति मात्रेत घेतल्याचे अमृताचे देखील अजीर्ण होते. ही बाब तशी सर्वश्रुतच आहे. आहार आणि औषधाला जसा मात्रेचा नियम लागू आहे, तसाच तो व्यायामालासुद्धा लागू आहे. ‘मात्रया तां समाचरेत्’ असे यापूर्वी सांगितलेलेच आहे. व्यायामाची सर्वसामान्य मात्रा सांगितली आहे. अर्धशक्ती! म्हणजे आपल्या शारीरिक क्षमतेच्या अर्धी. तेही हेमंत- शिशिर-वसंत या तीन ऋतूंत. अन्य तीन ऋतूंत तर व्यायाम त्याहूनही कमी करावा. मग ‘अर्धशक्ती’ हे परिणाम ओळखावे कसे? तर त्याचीही लक्षणे पूर्ण प्रयोगाअंती आचार्य चरकांनी सांगितलेली आहेत. घाम येणे, श्‍वासगती वाढणे, शरीर हलके वाटणे अशी लक्षणे जाणवू लागताच व्यायाम थांबवावा. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याची अर्धशक्ती वेगळी वेगळी असणार हे निश्‍चितच. परंतु एका सर्वसामान्य भारतीय मनुष्याची सर्वसाधारणपणे बारा सूर्यनमस्कारांपर्यंत अर्धशक्ती पुरते. शिवाय बारा सूर्यनमस्कारांमध्ये जेवढा वेळ त्वचा व सूर्यप्रकाशाचा संपर्क येतो, तेवढा वेळ एका सर्वसामान्य व्यक्तीच्या कॅल्शियम शोषणाच्या दैनिक गरजेच्या दृष्टीने ढोबळ मानाने पुरेसा ठरतो. हा विलक्षण वैज्ञानिक योग आहे. त्यामुळे दररोज बारा सूर्यनमस्कार करण्याचे विधान आहे.
 सूर्यनमस्काराला केवळ व्यायामापुरते मर्यादित ठेवणे पूर्णत: सयुक्तिक ठरणार नाही. वस्तुत: यात दहा विविध योगासने समाविष्ट आहेत आणि आसनांमध्ये व्यायामापेक्षा अधिकचा पैलू म्हणजे श्‍वसनप्रक्रियेचे नियंत्रण. सूर्यनमस्कार करताना केले जाणारे नियंत्रित, लयबद्ध श्‍वसन हे सूर्यनमस्कारांना साध्या व्यायामापेक्षा अधिक लाभप्रद बनविते.
 भारतीय जीवनशैली ही सर्वोत्तमाची आस बाळगणारी आहे. त्यामुळे निव्वळ व्यायामातून श्‍वासनियंत्रणाचे युक्त योगासनांकडे ती वळते. तेथून पुढे ती योगासनांचे क्रमबद्ध एकत्रीकरण करून त्याचा सौर ऊर्जेशी समन्वय साधत सूर्यनमस्कारांचा आविष्कार करते आणि त्यापेक्षा पुढे जात मंत्रशक्तीचा त्याच्याशी अन्वय जोडते. समंत्र सूर्यनमस्कार हा एक स्वतंत्र आणि तात्त्विकदृष्ट्या गहन विषय आहे. परंतु त्यात वापरलेली सूर्याची बारा समानार्थी नावे त्या सौरशक्तीपासून मनुष्याला होणार्‍या विविध फायद्यांची सूचक आहेत. ‘मित्र’ हे त्यातले पहिले नाव. हे नाव शब्दकोशानुसार कार्याप्रति प्रवृत्त करणारा या अर्थाने सूर्यासाठी वापरले आहे. तो पृथ्वीचे पोषण करतो व पर्यायानेच अन्नोत्पादक आहे. ‘रवि हे नाव ‘रव’ शब्दापासून बनले. रव म्हणजे शब्द. अर्थात सूर्य आपली श्रवणशक्ती वाढवितो. ‘सूर्य’ नावातून तेजस्वितेचा व स्वरशक्तीचा बोध होतो. ‘भानु’ म्हणजे शोभून दिसणारा. हे नाव असे सांगते, की सूर्याची ऊर्जा आपल्या रूपाला सुशोभित करते. ‘खग’ म्हणजे आकाशात संचार करणारा. या अर्थाने सूर्य आपल्याला लाघव, चपळाई देणारा ठरतो. ‘पूष्ण’ नावाने सूर्य आपला पोषणकर्ता आहे. ‘हिरण्यगर्भ’ असे सूर्याचे नाव मोठे विलक्षण आहे. हिरण्य म्हणजे सोनं किंवा धन. धनाची प्राप्ती श्रम-उद्यमाशिवाय शक्य नाही. उद्यमशीलतेला प्रोत्साहित करून सूर्याची ऊर्जा ही ध्यानप्रदायिनी सुद्धा ठरते. ‘मरीचि’ अर्थात अगणित कर किंवा किरणे असलेला सूर्य. या नावातून सूर्य आपल्याला विविध कर्मांमध्ये प्रवण बनवितो. अर्थात तो ‘मल्टी टास्किंग’चा प्रवर्तक आहे. ‘आदित्य’ नामक सूर्य अदितीचा पुत्र आहे. म्हणजेच तो उदात्त-मंगल-शुभ प्रवृत्तीमधून उत्पन्न झालेला आहे. तो आपल्याला सदाचाराचे दान देतो. ‘सवितृ’ हे नाव वितरणाच्या किंवा दातृत्वाच्या गुणाला अधोरेखित करते. ‘अर्क’ हे नाव विशुद्ध श्रेष्ठतेला प्रतिपादित करते आणि भास्कर आपल्या प्रभेला, कांतीला उजळविणारा ठरतो. या बाराही नावांतून सूर्याची सर्वंकष उपकारकताच दिसून येते.
 भारतीय परंपरेत मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कालखंडात सूर्यनमस्कार करण्याचे विशेष महत्त्व आहे. परंतु ते केवळ या महिन्याभरातच करावेत, असे मुळीच नाही. नव्या अभ्यासकाने ते या कालावधीत सुरू करावेत. त्या मागे सुद्धा एक कारण आहे. भारतीय कालगणनेमध्ये श्रावण ते पौष ही सहामाही विसर्ग काल म्हणून ओळखली जाते. तद्वतच माघ ते आषाढ हे सहा महिने ‘आदान काल’ नावाने परिचित आहेत. मकर संक्रमण ते रथसप्तमी हा पौषातील काळ आहे आणि विसर्ग कालात शरीरबल चांगले असते. आधुनिक चिकित्सकांच्या दृष्टीनेही हा ‘हेल्दी सिझन’ आहे. त्यामुळे शारीरिक बळ चांगले असताना सूर्यनमस्कारांना सुरुवात केलेली चांगली. त्यातही विसर्गकाळाच्या शेवटी शेवटी प्रारंभ करून लगेच पुढे आदान काळात सुद्धा घटत्या शरीरक्षमतेमध्ये त्याचे सातत्य कायम राखण्याने काटकपणा व सहनक्षमता (स्टॅमिना) वाढते.
 आज रथसप्तमी स्वामी विवेकानंदांच्या सार्धशती महोत्सवाअंतर्गत या कालावधीत सूर्यनमस्कारांबद्दल सर्वांना जागरूक केले जात आहे. स्वामीजींच्या व्यक्तित्वात-चिंतनात राजयोगाचा नेहमी उल्लेख येतो. परंतु आसने-सूर्यनमस्कार ही तर तांत्रिकदृष्ट्या हठयोगाची प्रतिनिधी अंगे आहेत. असे असले तरीही स्वामीजींच्या वैचारिक दर्शनात बलोपासनेला विशेष महत्त्व आहे.
 ‘तरुणांनी गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळावा’ हे स्वामीजींचे विधान सुप्रसिद्ध आहे. अशा ऊर्जस्वल स्वामीजींनी राष्ट्रकार्यात इतका देह कष्टविला, की त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, अनिद्रा आणि लबॅगो अशा पाच व्याधींनी पछाडले. परंतु त्याचा लोकांना तसूभरही प्रत्यय येऊ न देता त्यांनी आपले महनीय राष्ट्रकार्य लीलया केलेच. स्वामीजी लोकोत्तर महापुरुष होते. त्यामुळे व्याधींना भीक न घालता आपले दिव्य कार्य सुरू ठेवण्यामागे त्यांची अलौकिक आध्यात्मिक शक्ती होती, हे तर निश्‍चित. परंतु रोगोत्पादक कारणे घडल्यास रोग होणारच. हा निसर्गनियम आहे आणि रोग झाल्यावर शारीरिक क्षमता क्षीण होणेही क्रमप्राप्तच आहे. परंतु अशा स्थितीत देहबल कायम राखण्यास स्वामीजी स्वत: दररोज सूर्यनमस्कार करीत, असा उल्लेख त्यांच्या चरित्रात आढळतो. ऋषिप्रणीत गोष्टी नेहमी उपकारकच असतात, हे आपल्याला स्वामीजींच्या सूर्यनमस्कारोपासनेतून कळून येईल.
 वैज्ञानिक आधारावर आविष्कृत झालेल्या आणि स्वामी विवेकानंदांसारख्या अद्भुत महापुरुषाने पुरस्कृत केलेल्या सूर्यनमस्कारांना संपूर्ण व्यायाम असे संबोधल्यास वावगे ठरणार नाही आणि सार्धशतीच्या निमित्ताने सूर्यनमस्कारांविषयी जनजागृती आणि त्याचा अंगीकार केल्याने समर्थ भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकले जाईल, असे वाटते.
 डॉ. प्रसाद देशपांडे
 ९८२२८२८५४४

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी