Saturday, June 5, 2010

डॉ. भूषणकुमार


...त्यांनी मन जिंकले !
सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून आपल्या अभिनव कार्यपद्धतीचा ठसा उमटविणारे डॉ. भूषणकुमार उपाध्याय. आता त्यांची पदोन्नतीवर बदली होत आहे. त्यानिमित्ताने...
बिहार विद्यापीठातून संस्कृत विषयात एम.ए. करणारे आणि सुवर्णपदक मिळविणारे, संस्कृत ध्वनीविज्ञान या विषयावर पीएच.डी. करणारे डॉ. भूषणकुमार उपाध्याय. ते मूळचे बेदीबन-मधुबन, चंपारण्य बिहार येथले. विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या वडिलांना निष्कारण, अपराध नसताना पोलिसी त्रासाला सामोरे जावे लागले. परिणामी "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद आचरणातून साकारण्याचा संकल्प विद्यार्थी दशेतल्या भूषणकुमार यांनी केला आणि त्यांची पुढील वाटचाल सुरू झाली.
मानस व्यवस्थापक असलेल्या डॉ. भूषणकुमार यांच्या कार्यपद्धतीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध केवळ वरवरच्या निकषांनी करणे अपुरे राहील. त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची भाषणे आणि त्यांच्या कार्याची शैली या तीनही बाबींचा एकत्र विचार केला, तर त्यांच्या यशाचे रहस्य उलगडेल.
डॉ. भूषणकुमार हे केवळ संस्कृतचे पंडितच नाहीत, तर ते उर्दूचे चांगले जाणकारही आहेत. उर्दूवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. हिंदुत्वावर श्रद्धा असणाऱ्या कार्यकर्त्यांना ते जेवढे जवळचे वाटतात, तेवढेच ते धर्मप्रेमी मुस्लिमांना देखील जवळचे वाटतात. दलित संघटनाच नव्हे तर इतरही छोट्या-मोठ्या संस्था, संघटनांना डॉ. भूषणकुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम राबविताना आनंद मिळतो. लोकांत इतका मिसळलेला, लोकांची मने जाणणारा व जिंकणारा हा सोलापुरातला पहिलाच पोलीस अधिकारी असावा.
डॉ. भूषणकुमार हे मनाच्या शक्तीचे मोठे अभ्यासक आहेत. जगातील मोठ्या जनसमुदायावर, जनमानसावर दीर्घकाळ अधिराज्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त, मुहम्मद पैगंबर, स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आईन्स्टाईन, सिग्मंड फ्रॉईड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी या महापुरुषांच्या जीवनकार्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. "जगज्जेते ...त्यांनी मन जिंकले' हे त्यांचे पुस्तक अभ्यासले तर ध्यानात येते की, स्वत:च्या हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगूनही त्यांनी अन्य धर्मांतील मानवाला उपकारक मूल्यांबद्दल कशी श्रद्धा व्यक्त केलीय.
कुराण आणि बायबल या धर्मग्रंथांमधील सकारात्मक जीवनविचार प्रभावीपणे मांडण्याची डॉ. भूषणकुमार यांची हातोटी अद्‌भूत आहे. त्यामुळेच अन्य धर्मीयांमध्येही त्यांच्याप्रति आदराची भावना आहे, परंतु असे असले तरी धर्मांध प्रवृत्ती ठेचण्यासही ते हयगय करीत नाहीत. मुल्लाबाबा टेकडीसारख्या ठिकाणी प्रसंगी मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन करणे असू द्या किंवा सोन्या मारुतीसमोरील मशिदीचे रस्त्याच्या कडेने सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबविणे असू द्या (3 एप्रिल 2009), समाजात अशांती उत्पन्न करणाऱ्या प्रवृत्ती उफाळूच नयेत, यासाठीचा त्यांचा प्रयत्न असतो, परंतु योग्य वेळी दंडुक्याचाही वापर ते आवर्जून करतात. गेल्याच महिन्यात एका दुकानदारावर हात उगारणाऱ्या एका मंडळाच्या मुजोर कार्यकर्त्यांची घटनास्थळीच धुलाई केली, हे सोलापूरकरांना स्मरत असेलच.
सोलापुरातील एका मदरशात कापण्यासाठी गायी आणल्या होत्या. त्यावेळी गायी खाटकांनाच द्याव्यात यासाठी एक आमदार महाशय प्रयत्नरत होते. तेव्हा न्यायालयीन प्रक्रियेतून गायी सोडविण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. (11 डिसें. 2008)
हिंदुत्व चळवळीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या निमित्ताने त्यांना भेटायला जातात, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, "बाबारे, तू भगवद्‌गीता वाचलास का? वेद पाहिलेस का? उपनिषदे, जी आपल्याला शक्ती देतात, ते कधी समजून घेतलास का? स्वत: धर्माचरण करणे हे धर्मरक्षणच नाही का?'
खरे आहे त्यांचे. एकांतिक धर्माचे लोक धर्मांतरणासाठी विविध प्रयत्न करीत असतात. जिहादी मानसिकतेतून अनेक देशबाह्य शक्ती पद्धतशीरपणे काम करीत असतात. अशावेळी हिंदुत्वाचे हंगामी प्रेम अंगात संचारलेले तरुण मिरवणुकांच्या वेळी केवळ गुलाल उधळण्यात आणि विशिष्ट ठिकाणी, की जिथे आधीच पोलीस बंदोबस्त असतो, हुल्लडबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात; यातून काय साध्य होणार आहे? लक्षावधी रुपयांची वर्गणी गोळा होते, त्यातून भगवद्‌गीता, उपनिषदे लोकांपर्यंत पोचविता येणार नाहीत?दारिद्र्यात पिचलेल्यांना प्रेमाचा हात दिला तर ते धर्मांतराला का बळी पडतील बरे?
भारतीय विचारधारा, संस्कृती सर्वसमावेशक आहे. इतर धर्माप्रति सहिष्णुता हे केवळ हिंदू धर्माचेच वैशिष्ट्य आहे. आमचे पूर्वज खूप महान होते! भारत हा पूर्वी वैभवशाली होता. हे सारे खरे आहे, परंतु असे असूनही आम्ही दीड हजार वर्षे अन्य धर्मींयाच्या पायी का चिरडलो गेलो? असा मूळ प्रश्न ते करतात. आपण कुठे चुकलो, याची चिकित्सा करणारी पुस्तके निर्माण होत नाहीत, ही त्यांची व्यथा आहे. ते सांगतात की, आजवर भारत देशात केवळ दोनच महापुरुष होऊन गेले की, ज्यांनी आपण कुठे चुकलो, याची परखड आणि मूलगामी मीमांसा केली आहे. ते दोन महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर होत. या दोन्ही महापुरुषांचे विचार तरुणांनी अभ्यासून आत्मसात केले पाहिजेत. डॉ. भूषणकुमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर ध्यानात येते की, त्यांचे समाजाच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चिंतन आहे, अभ्यास आहे, काही योजनाही आहेत. ते शासकीय पदावर असल्यामुळे काही विषयांवर बोलण्याला मर्यादा असल्याचे ते मान्यही करतात. त्यांच्या कार्यशैलीबद्दल कमी शब्दांत सांगायचे तर याठिकाणी ऑर्गनायझर या नियतकालिकात मध्यंतरी प्रकाशित झालेल्या बातमीचे उदाहरण देता येईल. उत्तर भारतातील एका राज्यात (बहुधा उत्तराखंड)30 हून अधिक पोलीस ठाणी अशी आहेत की, जिथे गेल्या 5 वर्षांत एकही गुन्हा नोंद झालेला नाही. तेथील समाजात असलेले सामंजस्य महत्त्वाचे आहे. असे सामंजस्य हे केवळ दंडुक्याच्या धाकाने नाही, तर लोकांची मने संस्कारित केल्याने आणि नाठाळांना दंडित करून गुंड प्रवृत्तीला धाकात ठेवल्याने येत असते. हेच आहे मनाचे व्यवस्थापन. भलेही सोलापुरातील घरफोडी आणि इतर गुन्हे शंभर टक्के कमी झाले नसतील... पण तसा प्रामाणिक प्रयत्न आपल्या साऱ्या क्षमता पणाला लावून डॉ. भूषणकुमार यांनी केल्याचे दिसते. त्यांच्या बदलीच्या वृत्ताने या प्रवृत्तीला आनंद झाल्याच्या वार्ताही येत आहेत. असे विचारी, अभ्यासू आणि समर्पित पोलीस अधिकारी आणखी मोठ्या स्थानी पोचले पाहिजेत. पोलीस दलाची ध्येय-धोरणे ठरविणारी चमू जेव्हा अशा अधिकाऱ्यांची असेल, तेव्हा त्याचा दूरगामी आणि सकारात्मक परिणाम होईलच होईल! डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना त्यांच्या उज्ज्वल कारर्कीदीसाठी "तरुण भारत' परिवाराकडून शुभेच्छा!

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी