Friday, December 12, 2008

मदरसा आणि गाय


मदरसा आणि गाय


"मदरसा' हा शब्द वर्तमानपत्रे आणि वाहिन्या यांच्यामधून नेहमी ऐकायला मिळतो. मुस्लिम पंथाच्या मुलांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेला "मदरसा' म्हटले जाते. मदरशांमध्ये काय शिक्षण दिले जाते, याबद्दल मात्र मतमतांतरे आहेत. मदरशांमधून केवळ नैतिकतेचे, धार्मिकतेचे शिक्षण देण्यात येते असे सांगण्यात येते. मदरसा म्हणजे कडवे आणि धर्मांध मुसलमान बनविण्याचा कारखाना असतो, असाही आरोप होत आला आहे. या आरोपाला पुष्टी देणाऱ्या बऱ्याच गोष्टी वारंवार जगासमोर आल्या आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये मदरशांमधून अतिरेकी निर्माणाचे काम घाऊक प्रमाणात सुरू असते, याबद्दल संशय घेण्याचे कारण नाही. अफगाणिस्तानातील तालिबान आणि पाकिस्तानच्या लाल मशिदीतील गाजलेला मदरसा ही त्याची ठळक उदाहरणे होत.
भारतातील सर्वच मदरशांमधून असे शिक्षण देण्यात येत नसले तरी काही मदरशांमधून धर्मांध पिढी निर्माणाचे काम सुरू असते, हे काही लपून राहिलेले नाही. हैदराबादेतील मदरशांमध्ये देण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह प्रशिक्षणाचा विस्तृत अहवाल एका हिंदी वृत्तवाहिनीने काही महिन्यांपूर्वी ठळकपणाने दाखविला होता. मदरशांवरील हा कलंक पुसला जावा, असे सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना वाटणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे, परंतु मंगळवारी बकरी ईदच्या दिवशी सोलापुरातील एका मदरशाच्या आवारात झालेल्या गायींच्या कत्तलीमुळे सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानले गेले आहे. गायीला 33 कोटी देवतांचे वसतीस्थान मानले गेले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात गायींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्या आधीपासूनच गोहत्या बंदीची मागणी संपूर्ण भारतभरातून होत आलेली आहे. महात्मा गांधी म्हणतात, "माझ्या हाती सत्ता आली तर सर्वप्रथम मी गोहत्या बंदीचा कायदा करेन.' थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, भारतातील बहुसंख्य असलेल्या समाजाची गोहत्या बंद व्हावी, ही तळमळीची मागणी आहे. हा हिंदूंच्या भावनेचा आणि श्रद्धेचा मुद्दा तर आहेच, शिवाय आर्थिक, पर्यावरणाच्या दृष्टीनेही गोहत्येवर बंदी आली पाहिजे, ही सर्वमान्य झालेली बाब आहे. या स्थितीत मुसलमानांनी उत्स्फूर्तपणे गोहत्या न करण्याची शपथ घेतली आणि तशी कृती केली तर हिंदू-मुस्लिम ऐक्य खऱ्याअर्थाने साध्य होणार आहे.
थोर विचारवंत आणि स्तंभलेखक पद्मश्री मुजफ्फर हुसैन आणि अन्य अनेक मुस्लिम विचारवंतांनी गोहत्या मुस्लिमांनी स्वयंस्फूर्तीने बंद केली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. भारतभूमीतील संस्कृतीच अशी आहे की, मुस्लिमांनी गोहत्या आणि गोमांसभक्षण बंद केले तर नैसर्गिकपणे भारतातील मुस्लिम समुदाय येथील जनमनाशी एकरूप होऊन जाईल. केवळ गोहत्या आणि गोमांसभक्षण यामुळेच येथील मुस्लिम आणि हिंदू समुदायात खोल दरी निर्माण झाली आहे. मुस्लिमांनी समजुतदारपणा दाखविला तर शेकडो वर्षांचा दुरावा नष्ट होऊन एकोपा निर्माण होऊ शकतो, परंतु ज्यांना हिंदू-मुस्लिम एकोपा नको आहे, असे तत्त्व सदैव गोहत्येचा आग्रह धरतात.
सोलापुरातील मदरशाच्या आवारात गायींची कत्तल होणे किती गंभीर बाब आहे, हे सोलापुरातील मुस्लिम समुदायाने समजून घेतले पाहिजे. मदरशांमध्ये बेकायदा कत्तलखाना चालविणे, या गोष्टीला मुस्लिमांनीच आक्षेप घेणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या जागरुकतेमुळे 69 गायी आणि बैलांचे प्राण वाचले, ही अभिनंदनीय गोष्ट आहे! सोलापुरातील मुस्लिम संस्था, नेते आणि अन्य सामाजिक संघटनांनी या कार्यकर्त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम करून अभिनंदन केले पाहिजे.
मुक्त करण्यात आलेल्या 58 बैलांना खाटकांच्या ताब्यात देण्याला कोर्टाने साफ नकार दिला आहे. तसेच पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहोळकर यांनी जप्त केलेले 58 पैकी 42 बैल शेती आणि प्रजोत्पादनास उपयुक्त असल्याचा अहवाल दिला होता, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु आमदार नरसय्या आडम यांनी गुरुवारी काही मुस्लिम नेत्यांना सोबत घेऊन कोंडवाड्यातील गायी-बैलांची पोलीस आयुक्तांकडे मागणी करणे निषेधार्ह आहे. आडम मास्तर हे आता "ऍडम' मास्तर झाले आहेत. गेल्याच महिन्यात त्यांनी आपल्या कन्येचा ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये विवाह लावून दिला आहे. आडम मास्तर यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. इथपर्यंत सहन करण्यासारखे आहे, परंतु आता "ऍडम' मास्तर यांचे नाव पुढे करीत कोणी ख्रिस्ती धर्मप्रसार करीत असेल तर मात्र हिंदूंना विचार करावाच लागेल. "ऍडम' मास्तर यांनी गायींना खाटकांच्या ताब्यात द्या, अशी मागणी करून स्वत:ची "खरी' ओळख करून दिली आहे. अशा मतलबी राजकारण्यांपासून हिंदू आणि मुस्लिमांनी सावध झाले पाहिजे.
मदरशांचे पावित्र्य जपत तेथे केवळ नैतिक आणि धार्मिक शिक्षणच दिले जाईल. तसेच हिंदूंसाठी श्रद्धास्थान असलेल्या गोमातेचा आदर राखला जाईल, यासाठी मुस्लिम बांधवांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आम्हास वाटते. शहरात शांतता आणि सुव्यवस्था नांदण्यासाठी हाच राजमार्ग आहे. अन्यथा शांतता रॅली, शांतता कमिटीच्या बैठका आणि सर्वधर्मसमभावाच्या घोषणा या तकलादू आणि दिखावू ठरतील, याबद्दल आमच्या मनात शंका नाही.

दै। तरुण भारत, अग्रलेख , १३ दिसम्बर 2008

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी